
फोटो सौजन्य: iStock
खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने आता आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि त्याच्या तुलनेत न मिळणारा भाव यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत.
अलीकडच्या काळात उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते हा शेतीचा अविभाज्य घटक बनला आहे. ही गरज लक्षात घेता शासनाकडून खतांवर अनुदान दिले जात असले तरी प्रत्यक्ष बाजारात खतांचे दर गेल्या अनेक वर्षांपासून वाढतच आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात योग्य दर न मिळाल्याने संपूर्ण शेती अर्थचक्रच कोलमडले आहे.
Raigad News: प्रभागात केलेल्या विकासाकामांमुळेच आम्ही विजयी होऊ; महायुतीच्या उमेदवारांनी केला दावा
हंगाम सुरू होण्यापूर्वीच खतांच्या किमतीत गोणीमागे २०० ते २५० रुपयांची वाढ झाली आहे. सुरू होत असलेल्या हंगामात खतांचे दर अस्मानाला भिडल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझे आणखी वाढणार असून, उत्पादन खर्चात मोठी भर पडणार आहे. एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नसताना, दुसरीकडे खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. जुन्या व नवीन दरांमधील मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत.
एकीकडे रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे काही कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना जास्त दराने खते विकली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. युरिया खरेदी करताना त्यासोबत शेतकऱ्यांना नको असलेले किंवा न वापरण्याजोगे दुसरे खत सक्तीने घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात तक्रार कुणाकडे करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
Dapoli News: पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ; एकाचाच तब्बल ६ जणांना चावा
काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राचे दुकानदार त्या शेतकऱ्यांना वेठीस धरून पुढे खते देत नसल्याचे प्रकारही घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी व गरज पडल्यास त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, असे खांडगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी किरण ससे यांनी सांगितले.
“गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सोयाबीन आणि कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कापूस, मका, उडीद, तूर यांसारख्या प्रमुख पिकांनाही अपेक्षित भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत आता नेमके काय पिकवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत,” अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजेंद्र गीते यांनी व्यक्त केली.