शक्तिपीठविरोधात महामार्ग अडविला, वाहतूक ठप्प; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सांगली : शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने कोल्हापूर रोडवर अंकली येथे रास्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर ठाण मांडत कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग असताना नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे महामार्गात शेती जाणारे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आंदोलनात उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील आदी सहभागी झाले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
फडणवीसांच्या विधानानंतर आंदाेलन
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारने शेतकऱ्यांचा विरोध असेल तर महामार्ग स्थगित करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येताच महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महामार्ग जाहीर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांनी कृती समितीची स्थापना केली. महामार्ग रद्द झाला पाहिजे, ही भूमिका घेतली. सरकारने महामार्गाची अधिसूचना काढल्यानंतर त्यावर हरकती घेण्यात आल्या. नेत्यांना भेटून वस्तुस्थिती सांगण्यात आली. धरणे आंदोलन करण्यात आले.
हे सुद्धा वाचा : नाना पटोलेंचा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; ‘त्या’ मंत्र्यालाही हटवण्याची मागणी
रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबपर्यंत रांगा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने रस्त्याबाबत संदिग्ध भूमिका ठेवली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री जाहीर बोलले की विरोध फक्त कोल्हापूर येथील शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे तेथील रेखांकन बदलण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परत आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार रास्ता रोको करण्यात आला. महामार्ग अडवल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शक्ती पीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे. पण या जमिनी पिकाऊ असल्याने राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे.