Kolhapur News : राज्यातील महायुती सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या या विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. अशातच कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याची चिन्ह असताना या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बंदीचे आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनापूर्वी राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या घरी कोल्हापूर पोलीस पोहोचले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधात चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. अशातच बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. सुमारे ८६,००० कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या महामार्गासाठी बारा जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक जमीन बाधित होणार आहे. तुलनेत कमी मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर, कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पेटवली आहे.
काल (१ जुलै) कोल्हापूरसह बारा जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर, पंचगंगा नदीजवळ, शेकडो शेतकऱ्यांनी महामार्ग रोखत जोरदार घोषणाबाजी केली. “शक्तिपीठ रद्द झालंच पाहिजे!” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला.
अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप
या वेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येणार आहेत. विठ्ठलाने त्यांना सुबुद्धी देवो आणि हा महामार्ग रद्द करावा, यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत.” तसेच, त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा करू नये. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासविरोध नाही. शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी ड्रोन आले, तर गोफण वापरून ते पाडू.”