मोखाडा तालुका कृषी विभागाने दिली कालबद्ध मोहिमांना मुठमाती
दीपक गायकवाड/ मोखाडा: मोखाडा तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध मोहिमा राबविण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला होता. दिनांक 1 एप्रिल ते 31 डिसेंबर या कालावधीत माती परीक्षण, जमीन आरोग्य पत्रिका वाटप, खरीप हंगाम सभा, बीज प्रक्रिया मोहीम, खत वापर मार्गदर्शन, बियाणे तपासणी, शेती शाळा, गावनिहाय प्रशिक्षण मोहीम, आपत्कालीन पीक नियोजन, पीक स्पर्धा, फळबाग लागवड, जैविक खते व कीटकनाशक निर्मिती, एकात्मिक किड व्यवस्थापन, महाडीबीटी प्रणालीवर अर्ज वाढविणे आदी अनेक उपक्रम राबवायचे ठरविण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक गावाचा व्हॉट्सॲप गट तयार करणे, बोन्ड अळी व शंखी गोगलगाय निर्मूलन, मग्राहयो अंतर्गत फळबाग लागवड आदी जनजागृती मोहिमाही या योजनेत समाविष्ट होत्या.
राहुल गांधींना ‘तो’ Video यूट्यूबवरून डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सावरकरांची कोर्टात धाव
मात्र 1 एप्रिलपासून आजतागायत एकही मोहीम कृषी विभागाने राबवलेली नाही. शेतकऱ्यांमध्ये कोणतीही जनजागृती झालेली नाही किंवा योजनांची माहिती दिलेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान आणि योजनांचा लाभ मिळालेला नाही. कृषी विभागाच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
हंगामी शेतीवर अवलंबून असलेला मोखाडा तालुका आर्थिक, भौगोलिक आणि शेतीपूरक व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेला आहे. येथील शेतकऱ्यांना फळबाग लागवड, सिंचन सुविधा, आंतरपिके आणि उत्पन्न देणाऱ्या पिकांबाबत मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. यासाठी दीर्घकालीन रणनीती आणि प्रशासन व शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. मात्र वरिष्ठ कृषी यंत्रणांनी आखून दिलेले कालबद्ध कार्यक्रम स्थानिक कृषी प्रशासन राबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. त्यामुळे उन्नत शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या अपेक्षेने असलेल्या शेतकऱ्यांना आता कोणाकडे पाहायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उमाकांत गणपत हमरे या शेतकऱ्यांने आपली व्यथा मंडळी आहे . ते म्हणाले की खोडाळा विभागात कृषी विभागाने एकही मोहीम राबवली नाही, तसेच आम्हाला योजनांची माहितीही दिलेली नाही. शेतीशाळा घेण्यात आलेल्या नाहीत आणि फळबाग लागवडीसाठी वस्तुनिष्ठ मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आमच्या भागातील शेतकरी शेतीविषयक माहितीपासून वंचित राहिले आहेत.