महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवीन उपराष्ट्रपती
महाराष्ट्राचा राज्यपाल कोण होणार याकडे लक्ष
लवकरच नावाची घोषणा होण्याची शक्यता
Governor Of Maharashtra: आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते. आजच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. दरम्यान सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मात्र आता ते उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राचा राज्यपाल कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल कोण होणार हे पहावे लागणार आहे. केंद्रातील एनडीए म्हणजेच भाजप सरकार कोणाला महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी शिफारस करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपाल देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा असण्याची जास्त शक्यता आहे.
कसे असणार समीकरण?
संपूर्ण देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे कार्य आहे. देशभरात संघाचे लाखों स्वयंसेवक कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक भाजपची मातृसंस्था आहे. मात्र महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्वाचे मानले जाते. कारण महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राज्यपाल कोण होणार, तसेच संघ भाजपला कोणाचे नाव सुचवणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
आजच्या निवडणुकीत काय घडले?
आजच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले. लोकसभा व राज्यसभेतील मिळून एकूण खासदारांची संख्या 788 इतकी होते. दोन्ही सभागृहात 7 पदे रिक्त आहेत. म्हणजेच आज 781 खासदारांनी मतदान करणे अपेक्षित होते. त्यातील 13 खासदारांनी मतदान केले नाही. तर काही प्रमाणात इंडिया आघाडीचची मते फुटल्याचे देखील म्हटले जात आहे. 14 ते 15 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे म्हटले जात आहे.
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाकडूने विविध सुरक्षा यंत्रणांशी संयुक्त सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपतींची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली पोलिसांकडे नाही तर उपराष्ट्रपतीच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे असणार आहे.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केंद्रीय सशस्त्र दलाला याबाबत पत्र लिहिले आहे. गृह मंत्रालयाला सूचना दिल्यानंतर ब्लू बुक-२०२५मधील तरतुदींनुसार, सीआरपीएफला उपराष्ट्रपतींना सुरक्षा पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांना देखील काही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना उपराष्ट्रपतींच्या घरातील प्रवेशावरील नियंत्रण किंवा कार पॅसेज क्लिअरन्स ड्युटी आणि निवासस्थानाच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.