
Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात, माजी उपसभापती कैलास वराट, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, माजी सभापती सूर्यकांत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ राऊत आणि मंगेश आजबे यांनी केले.
नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मोर्चादरम्यान आंदोलकांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना अनेक शेतकरी अद्यापही सरकारी मदतीपासून वंचित आहेत. अनेक ठिकाणी पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्याचे, तर काही प्रकरणांमध्ये निकषांच्या नावाखाली शेतकऱ्यांना डावलले जात असल्याचे आरोप करण्यात आले.
पीक विमा योजनेबाबतही मोठा संभ्रम असून, विमा भरूनही योग्य भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. अत्यल्प रक्कम किंवा उशिरा मिळणारी भरपाई ही योजना शेतकऱ्यांसाठी संरक्षणाऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
कर्जमाफीबाबत घेतले जाणारे निर्णय हे अपुरे व पक्षपाती असल्याचा आरोप करत, स्पष्ट आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच सध्या सुरू असलेल्या हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
हमीभाव जाहीर असला, तरी हमालीच्या नावाखाली जादा पैसे, वजन व नोंदणी प्रक्रियेत अडथळे, तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या हातात पडणारी प्रत्यक्ष रक्कम कमी होत असल्याचा आरोप मोर्चादरम्यान करण्यात आला.
मोर्चाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची व सरसकट मदत, पीक विमा योजनेत पारदर्शकता, सर्वसमावेशक कर्जमाफी, तसेच हमीभाव केंद्रांवरील गैरप्रकार थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. तहसीलदार बांगर यांनी निवेदन स्वीकारून आंदोलकांशी संवाद साधला.
या आंदोलनात राजेंद्र पवार, पांडुरंग माने, युवराज उगले, मनोज भरे, कैलास हजारे, संतोष निगुडे, समीर पठाण, शरद ढवळे, चिराग आजबे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, नितीन गोलेकर, मुकुंद गोलेकर, धनुकाका बांगर, राजेंद्र गोलेकर, ऋषिकेश मुरूमकर, कुंडल राळेभात, किसनराव ढवळे, लक्ष्मणराव ढेपे, हरी पाटील गोलेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.