नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन रेल्वे मार्गाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. या संदर्भातील वस्तुस्थिती त्यांनी पत्राद्वारेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. केंद्रीय रेल्वे विभागाने पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव २०१९ साली नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर या मार्गाने तयार केला होता आणि त्यानुसार काही ठिकाणी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती.
मात्र, नंतर या प्रस्तावात बदल करून मार्ग बदलण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रकल्पात बदल करताना कोणत्याही प्रकारे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही, याकडेही मंत्री विखे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. सध्या प्रकल्प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, प्रशासकीय स्तरावर नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे याचीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, असे त्यांनी नमूद केले.
पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जेएमआरटी (JMRD) रेडिओ टेलिस्कोप सेंटर अडथळा ठरत असल्याचे कारण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत मांडले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, प्रकल्पाच्या मार्गाबाबत स्पष्टता यावी यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी आणि त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणीही मंत्री विखे यांनी केली आहे. २०१९ मधील मूळ प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
“चिंता करू नका, नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो. मात्र २०१९ साली तयार केलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल कोणी केला, हेही जनतेला कळू द्या,” अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.
देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन, प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळांच्या खोल्यांचे उद्घाटन तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डचे वितरण मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर प्रथमच स्पष्ट भूमिका मांडत, रेल्वे पळविल्याचा आरोप करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.
“स्वतःची अकार्यक्षमता लपविण्यासाठी काही जण रेल्वेच्या प्रश्नावरून शिट्या वाजवत आहेत. मात्र यांचा भोंगा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. पाणी आणि रेल्वे संदर्भातील आरोपांवर बोलताना त्यांनी, “पाणी पळवायला आम्ही खूप लांब आहोत,” असे स्पष्ट केले.






