Purandar Airport: पुरंदर विमानतळाचे नक्की काय होणार? शेतकऱ्यांचा विरोध तर सरकार ठाम; वाचा सविस्तर
सासवड: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध असताना शासन मात्र प्रकल्पावर ठाम असल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा नेवून शासनाचा जोरदार निषेध केला होता. तसेच कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होवू देणार नसल्याचा निर्धार केला होता. मात्र असे असताना प्रशासनाने प्रकल्प बाधित गावात जावून नोटीस पोहोच केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी नोटीस स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यासाठी शासकीय विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यापूर्वी किमान दोन, तीन वेळा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेवून विमानतळ प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर सासवड मध्ये तीन दिवसांचे उपोषण देखील केले आहे. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेवून जमीन न देण्याबाबत ठराव करून शासनाकडे पाठवून दिले आहेत. त्यानंतर शासनाकडून विविध वृत्तपत्र मध्ये जाहिरातीद्वारे विमानतळ प्रकल्पाबाबत हरकती व सूचना देण्याबाबत एक महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शासन त्यांच्या निर्णयवरती ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कोणत्याही मोर्चा, निवेदने, आंदोलने यांचा विचार न करता गावोगावी नोटीस पाठवून मोकळे होत आहेत.
Purandar Airport Project: तिसऱ्या दिवशी उपोषण मागे; पण पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध कायम
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या चावडीवर, सार्वजनिक ठिकाणी नोटीस ठेवण्यात आल्या असून नोटीस स्वीकाराव्यात आणि एक महिन्यात आपल्या हरकती लेखी स्वरुपात पुरंदरच्या प्रांताधिकारी कार्यालयात पोहोच कराव्यात असे त्यामध्ये म्हंटले आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे मोठ्या प्रमाणात वातावरण पसरले आहे. आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीनच द्यायची नाही., आम्हाला शासनाचा कोणताही परतावा नको, आम्हाला आमची जमीनच पाहिजे, आमचे गाव सोडून कुठेही जाणार नाही, त्यामुळे तुमच्या नोटीस स्वीकारण्याचा आणि त्याला उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही. अशी भूमिका सातही गावच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
राजकीय पाठींबा नसल्याने शेतकऱ्यांचा एकाकी लढा सुरु.
पुरंदरला विमानतळ प्रकल्प झाल्यानंतर प्रकल्प बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यामध्ये सुरुवातीला राजकीय पाठींबा मोठ्या प्रमाणात मिळाला. माजी आमदार संजय जगताप सुरुवातीपासून शेतकऱ्यांसोबत आहेत तो पाठींबा त्यांनी कायम टिकवून ठेवला आहे. त्यांच्या सोबतच सुरुवातीला आंदोलनात उतरलेले माजी जीप अध्यक्ष जालिंदर कामठे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. नंतरच्या काळात जालिंदर कामठे आणि बाबाराजे जाधवराव यांनी पक्षबदल केल्यावर त्यांच्या भूमिकेतही बदल झाला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी केवळ शेतकऱ्यांना विश्वासात घेवून विमानतळ करावे, त्यांचे नुकसान होवून देणार नाही असे सांगितले, मात्र शेतकऱ्यांच्या सोबत एकाही आंदोलनात कधी सहभाग घेतला नाही. एवढेच काय पण लोकसभेत प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरणारे राष्ट्रवादीचे नेतेही सध्या कुठेही दिसत नाहीत. सासवड येथे तीन दिवस उपोषण सुरु असताना एकाही राजकीय नेत्याने साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही राजकीय पाठबळ नसताना एकाकी लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकाकी लढा किती काळ टिकणार ? आणि तो यशस्वी होणार का ? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.