अवकाळीत पाटण तालुक्यात ७४ घरे व १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (File Photo : Unseasonal Rain)
बीड : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी उन्हाचा कडाका तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने कहर केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे सुमारे 2353.38 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड आदी जिल्ह्यात अनेक भागात चांगलाच दणका दिला होता. प्रत्यक्ष अवकाळी पाऊस व गारपिटीने नेमके किती नुकसान केले याचा अंदाज घेण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले. बीड जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान 39 गावातील 428 शेतकऱ्यांच्या 211.30 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये बीड तालुक्यांतील एका शेतकऱ्याच्या ६० गुंठ्यावरिल आंबा पिकाचे, आष्टी तालुक्यातील एका गावातील २०० शेतकऱ्यांच्या ८० हेक्टर ८० गुंठे क्षेत्रावरील कांदा, पेरू, संत्रा पिकाचे, पाटोदा तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांच्या ९० गुंठ्यावरील फळ पिकांचे तसेच अंबाजोगाई तालुक्यांतील २२४ शेतकऱ्यांच्या १२९ हेक्टरमधील फळ पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.
जालना जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. परंतु, भोकरदन तालुक्यातील ३३ टक्यांच्या आत नुकसान झालेल्या क्षेत्राचा अपवाद वगळता इतर तालुक्यात नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही फटका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे २०८२.८ हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार, गंगापूर तालुक्यातील २५ गावात ३२०८ शेतकऱ्यांच्या मका, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू आदी पिकांचे १३९१ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.
खुलताबाद तालुक्यातही नुकसान
खुलताबाद तालुक्यात गहू व कांदा पिकाचे सुमारे ३८५ हेक्टरवर तर कन्नड तालुक्यातील १४ गावात ६६ शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, मका, केळी कांदा आदी पिकांचे ३०३.८ हेक्टरवर तसेच सोयगाव तालुक्यातील तीन गावात आठ शेतकऱ्यांचे तीन हेक्टरवर मोठे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांना फटका
भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळातील सावंगी अवघडराव येथे ११५ शेतकऱ्यांचे ६० हेक्टरवरील क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. झालेल्या नुकसानीची मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत पाहणी सुरू असल्याचेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.