devendra-fadnavis
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. राज्यभरात भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाईसाठी आंदोलनंही होत आहेत. अशातच आता आता भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला. तसेच संभाजी भिडेंच्या वक्तव्यासंदर्भात राज्य सरकार उचित कारवाई करेल, असंही फडणवीसांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं. भिडेंच्या या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी भिडेंचा तीव्र निषेध केला आहे.