FDI Instruction for veg non veg hotels in pune
पुणे : शहरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यापुढे शाकाहारी जेवण बनवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यापुढे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे तयार करणे, त्यांची प्रक्रिया करणे आणि शिजवणे बंधनकारक असणार आहे. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला आहे.
पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे. FDA ने नियमावली जारी केली आहे. यामध्ये यापुढे शाकाहारी व मांसाहारी जेवण वेगवेगळे शिजवणे व तयार करणे किंवा प्रक्रिया करणे हे वेगवेगळे करावे लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अन्न व औषध प्रशासनाने सूचना जारी करताना सांगितले की, अन्न सुरक्षा हे केवळ कायदेशीर मुद्दा नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील जबाबदारी आहे. अनेकदा एकाच ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र हाताळल्यास किंवा शिजवल्यास भेसळीची शक्यता वाढते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः धार्मिक आणि नैतिक कारणांमुळे शाकाहारी लोक मासांहारी हॉटेलमध्ये जेवण करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवावावेत, असा सूचना अन्न व सुरक्षा प्रशासनाने दिल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे यापुढे हॉटेल व्यावसायिकांना शाकाहारी व मासांहारी जेवण तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागील वर्षी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील सुमारे 30 हजार हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षेबाबतचे आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. यावर्षी हा आकडा वाढवून एक लाख व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे अन्न सुरक्षेबाबत व्यावसायिकांमध्ये जागरूकता वाढेल. नागरिकांनाही अन्न भेसळ किंवा अन्न सुरक्षेशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. नागरिक हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून किंवा ‘Food Safety Connect App’ च्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.