नाशिक – नाशिक पदवीधर निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने सारीच राजकीय चक्रे उलटी फिरली आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिला आहे.
नाशिक पदवीधरसाठी धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर आज पाटील यांनी थेट मातोश्रीवर धाव घेत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचा पाठिंबा देणार नाही
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी पुत्रप्रेमापोटी उमेदवारी माघार घेतली. त्यामुळे त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. याची तक्रार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडकडे केली आहे. तसेच सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे.
मातोश्रीवर झाली बैठक
सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष अर्ज भरण्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. त्यांनी ही नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, नाशिकचा घोळ झाला त्या संदर्भात कुणालाच दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या-पालट्या सर्वच पक्षात होत असतात. तांबे कुटुंब हे परंपरागत काँग्रेसचे निष्ठावान कुटुंब आहे. ते असे करतील असे वाटले नव्हते. मात्र, आता आम्ही नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार नाही. याबाबत मातोश्रीवर बैठक होईल. त्यात योग्य तो निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
सोमवारी निर्णय घेणार
दुसरीकडे सत्यजीत तांबे यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले की, सुधीर तांबे हे काँग्रेसचे उमेदवार असते, तर त्यांना आम्ही पाठिंबा दिला असता. मात्र, आता आम्ही पाठिंबा देण्यासाठी इतर पर्यायाची चाचपणी करत आहोत. याबाबत आज मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक होणार आहे. तर यावर 16 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.