मुंबई : स्वतःला ओरिजनल शिवसेना म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांनी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देऊन अखेर कमळापुढे झुकत असल्याचे जाहीर केले आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
शिवसेनेतील बंडानंतर राज्यामध्ये होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असून शिंदे गटाने त्यांचा उमेदवार निवडणूकीच्या मैदानात का उतरवला नाही, असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. स्वतःला शिवसेनेचे खरे कैवारी म्हणणाऱ्यांनी निवडणूक रिंगणातून अंग काढून घेत पराभवाच्या भीतीने उमेदवारीची माळ भाजपच्या गळ्यात टाकली, असा आरोपही महेश तपासे यांनी यावेळी शिंदे गटावर केला.
[read_also content=”दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीसांवर सत्ताधार्यांचा दबाव; जयंत पाटलांचा आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/pressure-from-the-ruling-party-on-the-police-to-file-a-case-in-the-case-of-theft-in-the-milk-union-jayant-patil-allegation-nrdm-336079.html”]
ऋतुजा रमेश लटके यांचा मुंबई महापालिकेतील सेवेचा राजीनामा हा देखील कोर्टाच्या वटहुकुमानंतर स्वीकारला जातो एवढ्या दडपशाहीचे राजकारण शिंदे – फडणवीस सरकार करत आहे. महाराष्ट्रातील व देशातील भारतीय लोकशाहीवर व राज्यघटनेवर विश्वास ठेवणारी जनता हे पाहत असून या सर्वांचा निवडणुकींच्या माध्यमातून व कायद्याच्या माध्यमातून लवकरच निपटारा होईल, अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.