थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगभरातील 23 देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि पाहुण्यांचा सहभाग. थायलंडमधून आलेल्या पर्यटकांनी केवळ मिरवणूक पाहिली नाही, तर गणपती बाप्पाच्या आरतीतही उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, गणेशभक्तांची गर्दी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषामुळे परदेशी पाहुणे भारावून गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले. गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेशी पर्यटकांचा सहभाग आणि विसर्जन सोहळ्याच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
पर्यटन विभागाच्या विशेष दालनात उपस्थित अधिकाऱ्यांनी परदेशी पाहुण्यांसोबत गणपतीची आरती केली. या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र पर्यटनाच्या युवा दूत नवेली देशमुख उपस्थित होत्या.
इटलीहून आलेल्या मार्को यांनी हा सोहळा प्रथमच अनुभवल्याचे सांगितले. श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम या उत्सवात पाहायला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लाखो भाविक एकाच स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत असल्याचे दृश्य आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
फिनलँडहून आलेल्या जॉना सुनी यांनीही विसर्जन सोहळ्याचा अनुभव अनोखा आणि भावस्पर्शी असल्याचे सांगितले. ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि भाविकांचा उत्साह यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची भव्यता अनुभवायला मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम, आपुलकी आणि पाहुणचार विशेष भावल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. परदेशी पर्यटकांना उत्सवात सहभागी करून घेणे हा महाराष्ट्राच्या परंपरांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे राज्यातील सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्या म्हणण्यानुसार, विशेष दालनामुळे परदेशी पर्यटकांना विसर्जन मिरवणूक जवळून पाहण्याबरोबरच गणेशोत्सवाच्या भावनेशी जोडण्याची संधी मिळाली. अनेक पर्यटकांनी गणरायाच्या आकर्षक मूर्तींसोबत छायाचित्रे काढत हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन यामुळे परदेशी पाहुण्यांसाठी केवळ पर्यटनाचा अनुभव न राहता महाराष्ट्राची श्रद्धा, परंपरा, उत्सवप्रियता आणि आतिथ्यशील संस्कृती अनुभवण्याची संधी ठरली.
Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप






