"काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा", बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसेनेकडून प्रतिकात्मक आंदोलन
मुंबई : हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली तर काय होत हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उध्दव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत आज शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केले. बाळासाहेब उबाठाला माफ करा, सडका मेंदू साफ करा, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या सुशीबेन शहा, महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला.
शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या की, उबाठाची काय त्यांची गत झाली? काय अवस्था झाली हे कालच्या इंडि आघाडीच्या बैठकीत दिसून आले. शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाठाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही, म्हणून त्यांची माफी मागायला आलो, असे त्या म्हणाल्या. शिवसेना हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात असून जनता त्यांच्या मागे आहे, असे त्या म्हणाल्या. जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे ते आता सोफ्यावर बसतात असे त्या म्हणाल्या.
उध्दव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाहीत, झुकले नाहीत तर सरपटले, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. त्यांनी उबाठा सेना सोनिया गांधी यांच्या पायावर टाकली. शिवसेना भाजप युतीमध्ये असताना अमित शहा पण मातोश्रीवर येऊन गेले होते. आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता, अशी टीका म्हात्रे यांनी यावेळी केली.
दरम्यान काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे आरोप केले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची राहुल गांधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे फोटो समोर आले. यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आंदोलन केले. साहेब यांना माफ करा सडका मेंदू साफ करा अशा घोषणा देत आज दादर शिवाजी पार्क येथील बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर शिवसैनिकांनी आंदोलन केले.