नागपूर : नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपांखाली दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा (GN Saibaba) आणि इतर पाच जण अटकेत होते. मात्र, या अटकेची कारवाई झालेले जी. एन. साईबाबा आणि इतर पाच जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती विनय जोशी व न्यायमूर्ती वाल्मिकी एस. ए. मेनेझेस यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. साईबाबा व इतर पाच जणांवर सत्र न्यायालयाने 2017 साली दोषनिश्चिती केली होती. त्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयासमोर सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालयाने यासंदर्भातील निकाल दिला.
साईबाबासह पाच जणांना दिलासा
राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती आणण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे साईबाबा व इतर पाच जणांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.