माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा दिलासा; 'या' प्रकरणी निर्दोष मुक्तता
पेठ वडगाव : शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात एसटी बस पेटवल्याचा ठपका ठेवलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह बारा कार्यकर्त्यांची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती कश्यप यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरचा हा खटला गेल्या बारा वर्षे न्यायालयात सुरू होता. तब्बल एक तपाणी या खटल्याचा निकाल लागला आहे. निकाल लागताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
किणी टोल नाकाजवळ २०१२ साली ऊस दरासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात महामार्गावर उभे असलेली एक बस पेटली होती. सदरची ही बस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवली आहे, असा समज करून बस पेटवल्याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात या आंदोलनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा खटला गेली १३ वर्षांपासून न्यायालयात सुरू झाला होता. मात्र, सरकार पक्षाच्या वतीने एकही साक्ष न मिळाल्याने सबळ पुराव्याअभावी आंदोलकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हेदेखील वाचा : शक्तीपीठ महामार्ग बंदची हाक दिल्ली दरबारी! स्थगितीसाठी राजू शेट्टींनी घेतली नितीन गडकरींची भेट
यामध्ये अभिजीत खांडेकर, निलेश शेवाळे, संदीप गायकवाड, प्रविण जाधव, शिवाजी शिंदे, अमित दणाने, सुरेश पाटील, रोहन पाटील, महावीर पाटील, अभिजीत पाटील, रोहित पाटील, कुंथिनाथ मगदूम या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ॲड. सुधीर पाटील (नेज) यांनी सदर खटल्याचे कामकाज विनामूल्य केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक
कोणताही धरण, विमानतळ, महामार्ग अथवा रेल्वे यासाठी भूमी अधिकरण करावंच लागणार आहे. शक्तीपीठ महामार्ग हा देखील वेगवेगळ्या शक्ती पिठाला जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये. शेतकऱ्यांनी हा विरोध संपून नुकसानभरपाईच्या मागण्या मांडाव्यात, अशी प्रतिक्रिया सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध करत फक्त विकासाच्या नावाखाली हा रस्ता होत नसून विकास हा सरकारचा मायावी चेहरा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांना आपल्या जमिनी देऊन त्याग करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.