Anjali Damania on Ajit Pawar : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षउभारणीला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांना प्रचार करता यावा, तसेच त्यांचे मनोबल वाढावे यासाठी अजितदादा गटाकडून जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी गाडी भेट दिली जाणार आहे. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
जो पक्ष अजुन पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही , त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या ?
पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या ?
आता ED / ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का ? https://t.co/TQ6WXIHC0I
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 28, 2023
इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या?
जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही, त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या? पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या? आता ED/ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का? का अजित पवारांनी (Ajit Pawar) काबाडकष्ट करून कमावलेले पैसे कुठून येतात? एवढ्या गाड्या? सामान्य माणसाला एक गाडी घेतानादेखील नाकीनऊ येतात, असे ट्वीट करीत अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे.
आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी ६० गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण १० लाख ते २२ लाख इतकी असल्याचे समजते.