Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम, सौजन्य : चॅट जीपीटी
अनंत चतुर्दशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक चौपाट्या, तलाव गजबजून जाणार आहेत. अशात ऐतिहासिक अशा गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे पार पडणाऱ्या भल्य गणेश विसर्जन साहळ्याचा परदेशी पर्यटकांनाही अनुभव घेता यावा म्हणून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे येते एक विशेष दालन उभारण्यात येणार आहे.
या विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पाहुण्यांना आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा, गणेशोत्सवाचे ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्त्व तसेच विसर्जन सोहळ्याचे भव्य स्वरूप जवळून अनुभवता येणार आहे. यंदा गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक हे गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी त्यांना गणपती मिरवणुकीचे दर्शन घेण्याबरोबरच गणरायाची पूजा, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणामध्ये पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडणार आहे.
याबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, समृद्ध सांस्कृतिक परंपरा हे राज्याच्या पर्यटनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि उत्सवांचा आंतरराष्ट्रीय पर्यटकांना परिचय करून देण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गणेशोत्सवासारख्या लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनवाढीस चालना देण्यात येत आहे.
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, संजय खंदारे (भा.प्र.से.) म्हणाले की, गिरगाव चौपाटी येथे जे विशेष दालन उभारण्यात येणार आहे, त्याच्या माध्यमातून गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी पर्यटकांना समजावून सांगण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे प्रसार होण्यास मदत होईल.
तसेच पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण अनुभव आहे. विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची माहिती तसेच विसर्जन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.






