
Gokul Dudh Sangh Election, Kolhapur News,
कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच आमदार शिवाजी पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाजी पाटील यांनी विरोधात महायुतीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेल विरोधात मोर्चा उघडला होता. पण शिवाजी पाटील यांना बाजूला करूनच् महायुतीचे पॅनेल होणार असल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. हा शिवाजी पाटील यांच्यासाठी मोठा धक्काच मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोकुळमध्ये शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात जी भूमिका घेतली होती. त्याचा फटका आता त्यांना बसणार नाही ना, असाही सवास उपस्थित होत आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी मोठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. महायुतीत असतानाही शिवाजी पाटील यांनी न्यायालयीन लढाई सुरू केल्याने त्यांच्यावर चांगलीच नाराजी ओढावली आहे. याच काळात पाटील आणि मुश्रीफ यांच्यातील मतभेदही समोर येत होते. याच सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफांचा गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही कोल्हापूर जिल्ह्यात भेटीगाठी आणि राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र अद्याप जागावाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टता दिसत नसल्याची चर्चा आहे.
एका बाजूला हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील मतभेदांनी राजकारण तापले असतानाच, दुसरीकडे हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्यातही वादाची ठिणगी पडल्याचे चर्चा रंगली आहे. त्यातच महायुतीमध्ये ‘मोठा भाऊ कोण?’ या मुद्द्यावरूनही अंतर्गत संघर्ष सुरू आहे. महायुतीतील या अंतर्गत मतभेदांचा फायदा सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
सतेज पाटील यांनी महायुतीतील काही नेत्यांशीही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांची आणि त्यानंतर आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानीही भेट घेतल त्यांच्याशी चर्चा केली होती. या भेटींमुळे गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सतेज पाटील यांच्या भेटीनंतर शिवाजी पाटील यांनी “आमच्यासाठी पाटील दूरचे नाहीत,” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या सर्व घटनाक्रमामुळे
गोकुळच्या निवडणुकीत महायुती एकसंधपणे मैदानात उतरणार की अंतर्गत मतभेदांचा परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 15 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.