एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, बुलढाण्यातून मामा भाच्याच्या जोडीला अटक (फोटो सौजन्य-X)
Eknath Shinde death Threat News Marathi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
20 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांना अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेल आला होता. या मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी होती. मंत्रालय आणि जेजे मार्ग पोलिस स्टेशनलाही अशाच प्रकारचे धमकीचे मेल आले होते. हा मेल मिळताच पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला होता.
एकनाथ शिंदे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. रामलीला मैदानावर झालेल्या रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी एनडीए नेत्यांसोबत बैठक घेतली. रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीत नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.
पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या दोघांकडून सध्या तपास यंत्रणा या दोघांनी एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी का दिली याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचा तपास सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात असा दावा केला होता. पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला. ज्या वेळी हा फोन आला, त्या वेळी पंतप्रधान मोदी फ्रान्सचा दौरा पूर्ण करून अमेरिकेला जाणार होते.
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात, असा दावा फोन करणाऱ्याने केला होता. नियंत्रण कक्षाला एकाच क्रमांकावरून धमक्यांबाबत अनेक वेगवेगळे कॉल आले. चौकशीत असे आढळून आले की कॉल करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती.