छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथून गुटखा खरेदी करून एमआयडीसी वाळूजकडे जाणाऱ्या एका सेल्टॉस कारमध्ये चिकलठाणा पोलिसांनी गुटखा पकडला. पोलिसांना पाहून भरधाव पळून जाणाऱ्या कारचालकाचा पोलिसांनी ६ किलोमीटर पाठलाग केला. या कारवाईत पावणेचार लाखांचा गुटखा, १० लाखांची सेल्टॉस कार जप्त केली. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी सांगितले की, सोलापुर ते धुळे रोडने चिते पिंपळगाव कडून एक किया कंपनीची सेल्टॉस चारचाकीमध्ये (एमएच २० एफपी ७२७७) गुटखा नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन उपनिरीक्षक सतीश पंडित, हवालदार नवनाथ कोल्हे, पोलीस नाईक गणेश सोनवणे, अंमलदार रामेश्वर दापसे आदींसह निपाणी फाटा येथे सापळा लावला.
संशयित कार दिसताच, त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने कारचा वेग वाढवून पळ काढला. पथकाने त्याचा पाठलाग करत, त्याला गांधेली फाटा येथे अडविले. कारची झडती घेतली असता, कारमधील मागील सीट काढून तिथे मोकळी जागा करण्यात आली होती. तिथे तब्बल ३६ गोण्या ठेवलेल्या दिसून आल्या.
अमोल विभीषण काळे (३४, रा. तिसगाव, सिडको वाळूज महानगर १) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सतीश पंडित हे तपास करत आहेत.
१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
कारमधील ३६ गोण्या जप्त करण्यात आल्या. यापैकी पांढऱ्या रंगाच्या १८ गोण्यांमध्ये रॉयल ७१७ असे लिहिलेल्या गुटख्याच्या १८९० पुड्या आढळल्या. त्यांची किमत १,२२,८५० रुपये आहे. तसेच तपकिरी रंगाच्या १८ गोण्यामध्ये २ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीच्या हिरा पान मसाल्याच्या १८९० पुड्या सापडल्या. प्रत्येक गोणीत १०५ पुड्या ठेवलेल्या होत्या.