Congress Politics : हर्षवर्धन सपकाळ आज स्वीकारणार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार; अनेक नेतेमंडळी राहणार उपस्थित
मुंबई : काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित असे यश मिळाले नाही. या पराभवाची जबाबादरी स्वीकारत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी एकच्या सुमारास होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. यावेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांत तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. यानंतर पक्षात मोठ्ठया प्रमाणात फेरबदल अपेक्षित होते. त्यानुसार महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपद बदलण्यात आले. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे देण्यात आली आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक आदी उपस्थित राहणार आहेत.
अनेक नेतेमंडळी राहणार उपस्थित
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया क कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यासह सर्व प्रदेश कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
नाना पटोले यांनी चार वर्षे सांभाळलं पद
नाना पटोले यांनी चार वर्षे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेत महाविकास आघाडीला अपेक्षित यश नाही
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळाले नाही. इतकेच नाहीतर अनेक दिग्गज नेतेमंडळींचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, त्यावेळी हा राजीनामा झाला नाही.