Kolhapur-Rain
कोल्हापूर : राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.86 टीएमसी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.
चंदगड तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. तालुक्यातील घटप्रभा आणि ताम्रपर्णी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असा पाऊस कधीच झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नाचना, भूईमूग, आणि भात रोप लावणीसाठी यंदा पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी मात्र रोप लागणीच्या कामात व्यस्त आहेत. शहरात सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, पंचगंगा 32.09 फुटांवरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
राधानगरी धरण 42 टक्के भरले
राधानगरी धरण 42 टक्के भरले असून, त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद 1300 तर वारणा धरणातून 675 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून, आजूबाजूच्या शेतात पाणी शिरत आहे.