मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग; परभणी, नांदेडसह हिंगोलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतिक्षाच असल्याचे पाहिला मिळत आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मात्र, परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सेलू शहरातील देवुळगाव गात येथील कसुरा नदीलाही पाणी आले आहे. सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेलू शहरातील सेलू शहरातील तेली गल्ली, अरब गल्ली, नाला रोड परिसरात नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झाले असून, अन्न धान्य व संसार उपयोगी साहित्यचे या पावसात नुकसान झाले आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी शेतात पाणीही साचले आहे. जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
परभणी आणि बीड या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर जालना आणि हिंगोलीत देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची परिस्थिती गंभीर झाली होती. असे असतानाच वरूणराजाने परभणीकरांची इच्छा पूर्ण केली. परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्याला पाणी आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने घेतली विश्रांती
मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे.