वसई । रविंद्र माने : २८ मार्चच्या रात्री एका दुचाकी स्वारावर झडप घालून वसई किल्लाय परिसरामध्ये गडप झालेला बिबट्या अखेर २५ दिवसांनी वनविभागाच्या पिंजऱ्यात अटकला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
वसई किल्ला परिसरातून रात्री ८ वाजता दुचाकीने जाणाऱ्या एका तरुणावर बिबट्याने झडप घातली होती. त्यानंतर तो गडप झाला होता. या बिबट्याला शोधण्याचे विनविभाग, पोलीस, ग्रामस्थ आणि एनजीओने कसून प्रयत्न केले होते. २१ दिवस सातत्याने वनविभाग आणि एनजीओच्या पथकाने किल्ला परिसर पिंजून काढला होता. मात्र, बिबट्या पिंजऱ्यात तर दुरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला नव्हता. त्याला पकडण्यासाठी रात्री सातनंतर रो-रो सेवा आणि ग्रामस्थांचा वावरही बंद करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या सर्वांनाच धारेवर धरले होते.
अखेर किल्ल्यातील एका लहानशा भुयारात बिबट्या असण्याची शक्यता लक्षात घेऊन भुयाराच्या दोन्ही तोंडावर पिंजरे लावण्यात आले होते. मंगळवारी पहाटे बिबट्या भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडला आणि पिंजऱ्यात अडकला आणि सर्वांनीच हुश्य…करत सुटकेचा निश्वास सोडला. या बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करुन जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.