कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पुनर्स्थापन उपक्रमाला मोठे यश मिळाले असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 ही ‘तारा’ (STR T-04) हे नवीन नाव मिळालेली तरुण वाघीण यशस्वीरीत्या सह्याद्रीत दाखल झाली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा आणि पेंच येथील एकूण आठ वाघांचे सह्याद्रीत स्थानांतरण करण्यास दिलेल्या मंजुरीनंतर ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ही पहिली मोठी कामगिरी यशस्वी झाली.
भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. जवळपास तीन वर्षांची ही तंदुरुस्त वाघीण एनटीसीएच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. पकडल्यानंतर तिला आवश्यक अशा सर्व वैद्यकीय तपासण्या करून, विशेष तयार केलेल्या वन्यजीव वाहतूक वाहनातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आले.
बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता मोहिम सुरू झाली आणि सायंकाळी ५ वाजता ताऱ्याला यशस्वीरित्या पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता आणि आरोग्य तपासणीनंतर रात्री १० वाजता कराडमार्गे चांदोलीकडे प्रवास सुरू झाला. या मोहिमेत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक – वनसंरक्षक संदेश पाटील व बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल ऋषीकेश पाटील, प्रदीप कोकितकर, किरण माने, संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वन्यजीव संशोधक आकाश पाटील व संपूर्ण पथकाने कौशल्यपूर्ण समन्वय साधून मोलाची भूमिका बजावली.
विशेषतः वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे आणि वन्यजीव संशोधक आकाश पाटील यांनी वाघीण निवड, पकड, वैद्यकीय तपासण्या ते सह्याद्रीत सुरक्षित स्थलांतर या पूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.वन विभागाने यापुढेही अधिवास सुधारणा, निगराणी आणि वैज्ञानिक पद्धतींच्या सहाय्याने सह्याद्रीला सक्षम व्याघ्र अधिवास बनविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ताराचे आगमन हा या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
२७ तासांचा १००० किमीचा प्रवास पूर्ण करत शुक्रवारी रात्री १.३० वाजता ताराला चांदोली येथे आणण्यात आले. आणखी एकदा आरोग्य तपासणी करून पहाटे ३.२० वाजता सौनारली एनक्लोजरमध्ये तिला ‘सॉफ्ट रिलीज’ करण्यात आले. आता पुढील काही दिवस अनुकूलता निरीक्षणाखाली घेऊन झाल्यानंतर तिला हळूहळू जंगलात सोडण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.66 ऑपरेशन तारा हा सह्यादी साठी ऐतिहासिक टप्पा आहे, सॉफ्ट रिलीजमुळे वैज्ञानिक पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असून, आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षणाद्वारे सक्षम व्याघ्र अधिवास उभारण्यास कटिबद्ध आहोत.
– तुषार चव्हाण,
क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
● सह्याद्रीतील व्याध पुनर्स्थापनेसाठी हे स्थानांतरण महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा व सह्याद्री पथकांचे समन्वित व वैज्ञानिक कार्य प्रशंसनीय आहे.
– एम. एस. रेड्डी.
प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र असा विश्वास वन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.






