पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर हेमंत रासने यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हा पराभव स्वीकारला आहे. मी कुठं कमी पडलो ते मी पाहीन, मला आत्मचिंतन करावं लागणार आहे, असे ते म्हणाले.
संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत, तर हेमंत रासने यांना ६१७७१ एकूण मते मिळाली आहेत. या पराभवानंतर हेमंत रासने यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी बुथवाईज आकडेवारी पाहिली. त्यानंतर, सर्व गोष्टीचं बारकाईनं विश्लेषण करेन. मात्र, मी कुठे कमी पडलो ते मी पाहीन. मला आत्मचिंतन करावं लागेल’.
निकाल स्वीकारतो
तसेच रासने पुढे म्हणाले, ‘पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शवला, सर्व यंत्रणा माझ्यासाठी काम करत होती. मात्र, केवळ मी उमेदवार म्हणून कमी पडलो. जो निकाल लागला त्याचा मी स्विकार करतो’.