भिवंडी : लोकसभा निव़डणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. राज्यासह देशामध्ये भाजपला अपेक्षित असे य़श आले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपकडून 400 पारचा नारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 300 पार देखील भाजप करु शकली नाही. प्रचारावेळी 400 खासदार आल्यानंतर संविधान बदलण्यात येणार अशी विधान भाजप नेत्यांनीच केली. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. आता सत्ता स्थापनेनंतर भाजपच्या एका नेत्याने 400 पार सीट आले असते तर भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झाले असते असे विधान भाजप आमदाराने भिवंडीमध्ये केले आहे.
तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत
पडघ्यामध्ये हिंदू धर्मसभा व संत संमेलन याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे हैदराबादमधील आमदार टी. राजा सिंह हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अनेक दावे व विधानं केली आहेत. मात्र सध्या त्यांच्या एका विधानामुळं चर्चांना उधाण आले आहे. आमदार टी. राजा सिंह भाषणामध्ये म्हणाले, हिंदूंनी महाराष्ट्रात आपल्या सरकारचे व एकनाथ शिंदेंचे हात बळकट करायला हवेत. शिंदे यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशाचा हिंदू तुमच्यासोबत आहे. मलंगगडाला मुक्त करा. शिंदेजी, तुम्हाला कुणाचं भय आहे? आमच्या सभांना आडकाठी आणली जातेय, महाराष्ट्रात येण्यापासून अडवलं जातंय, आमच्यावर एफआयआर टाकल्या जात आहेत. कुणाचं भय आहे? शिंदेजी घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत. पण त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करू नका. जो हिंदूंच्या हितावर बोलेल, तो महाराष्ट्रावर राज्य करेल, असे विधान आमदार टी. राजा सिंह यांनी केले. त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे होता याची चर्चा रंगली आहे.
आता हिंदू राष्ट्र होईल असं वाटत नाही
ते पुढे म्हणाले, “हिंदू एकत्र आले तर हिंदू राष्ट्र बनेल हे आम्ही सांगतोय. पण आता असं वाटत नाही की आपण आपल्या भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू शकू. ही धर्मसभा असली, तरी निवडणुकीच्या दृष्टीनेही आपण याकडे पाहायला हवं. आपले हिंदू कशाप्रकारे विभागले गेले आणि लव जिहादी कसे एकत्र आले. राजकारणावर मला बोलायचं नाहीये. पण राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यावेळी निवडणुकीत जर आपण 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन” असे वक्तव भाजप आमदाराने केले.
अमोल मिटकरींचा पलटवार
आमदार टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यावर महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी टी. राजा सिंह यांना खडेबोल सुनावले आहेत. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर कर टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मिटकरी यांनी लिहिले आहे की, ‘टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.#भारतराष्ट्र’
टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.#भारतराष्ट्र
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 16, 2024