
sharad pawar
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणाच्या (Adani Case) चौकशीसाठी समिती नेमलेली आहे. त्यामुळे आता संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) नियुक्तीची आवश्यकता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. पण त्यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांमध्ये मतांतर असल्याचे दिसत होते. त्यानंतर आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेपीसी चौकशीबाबत भाष्य केले. त्यामध्ये ते बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.
हिंडेनबर्ग अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरून संसदेच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत बराच काळ कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर आता शरद पवार यांनी जेपीसीच्या मागणीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘सहकाऱ्यांना जेपीसी चौकशी हवी असेल, तर विरोध करणार नाही. विरोधी पक्षातील सहकाऱ्याचं वेगळे मत आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला विरोधी पक्षात ऐक्य ठेवायचे आहे. त्यामुळे सहकारी मित्र पक्षांना ‘जेपीसी’ चौकशी व्हावी वाटत असेल, तर त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही. पण, विरोधकांच्या ऐकीवर दुष्परिणाम होऊ नये, म्हणून आम्ही आग्रह धरणार नाही’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.