
साहिल वाकोडेच्या मृत्यूवरून राजकारण तापलं; वर्षा गायकवाडांचा IIT मुंबईबाहेर जोरदार एल्गार
IIT Bombay Sahil Wakode Case : मुंबईतील IIT मुंबईमध्ये विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप, पोलिसांकडून सुरू असलेला तपास आणि आता समोर आलेलं CCTV फुटेज यामुळे या प्रकरणाची चर्चा देशभरात होत आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर जातीय भेदभाव आणि मानसिक छळ झाल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, IIT मुंबईने अशा प्रकारची तक्रार विद्यार्थ्याने संस्थेच्या SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे केली नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, साहिल वाकोडेच्या मृत्यूवरून IIT मुंबईबाहेर आंदोलनांचा सिलसिला सुरू आहे. गुरुवारी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि NSUIच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. साहिल वाकोडे प्रकरण हे ‘संस्थात्मक मृत्यू’ असल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्षा गायकवाड यांनी IIT मुंबई आणि मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थेतील कथित विरोधाभासाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शिक्षण व्यवस्थेत जातीय भेदभाव होत असल्याचा आणि संस्थांमध्ये RSSचा प्रभाव वाढल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, हे राजकीय आरोप असून त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. दुसरीकडे, साहिलच्या काही वर्गमित्रांनी जातीय भेदभावाच्या आरोपांशी असहमती व्यक्त केली असल्याचेही वृत्त आहे.
या सगळ्या प्रकरणात CCTV फुटेज महत्त्वाचं ठरत आहे. समोर आलेल्या फुटेजनुसार, परीक्षेदरम्यान साहिलकडे काहीतरी पाहिल्याचं लक्षात आल्यानंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर साहिलला परीक्षा कक्षातून बाहेर जाताना पाहायला मिळतं. पोलिसांच्या तपासात या घटनाक्रमाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.
साहिलच्या मृत्यूनंतर IIT मुंबईने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन केली आहे. मुंबई पोलिसांची क्राइम ब्रँचदेखील CCTV आणि संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब तपासत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं, साहिल आणि प्राध्यापकांमध्ये काय संवाद झाला आणि त्यानंतरच्या घटनांचा मृत्यूशी काय संबंध आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.