बारामती : देशामध्ये सर्वत्र लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या थेट लढाईची सर्वत्र चर्चा आहे. ननंद भावजयमध्ये होणाऱ्या या लढाईमध्ये कोण सरस ठरतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी बारामती प्रचाराला सुरुवात केली असून पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतायत याचा मला आनंद आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराला सुरुवात केली असल्याचे सांगितले. खासदार सुळे म्हणाल्या, “लोकसभा जवळ आली आहे, त्यामुळे सगळे कामाला लागले आहेत त्यामध्ये आम्हीही प्रचार करीत आहोत. बारामतीत शरद पवारांचे जुने सहकारी काम करीत आहेत. पवार कुटुंबातील लोकांना ज्यांना प्रचार करायचा आहे आहे ते करतील. युगेंद्र पवार यांना चांगली चर्चा केली, सगळ्यांनी चांगली चर्चा केली. पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतात याचा मला आनंद आहे,” असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाषणामध्ये कुटुंबामध्ये त्यांना एकटे पाडले जात असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी कुटुंब त्यांच्या पाठिशी उभे असल्याचा आनंद असल्याचे मत व्यक्त केले.
त्याचबरोबर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यापूर्वी भाजपाने अगदी संसदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले. मात्र अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे आरोप कमी झाले आहेत. यावरुन सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेली 55 वर्ष राज्यात कुणी ही नेता आला तरी शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. काल आमच्यावर घराणेशाहीची टीका करण्यात आली आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करायचे,” असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.