मंगळवेढा : मंगळवेढा येथे नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथून विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्योत घेवून पायी पळत जवळपास १०० किमी अंतर कापत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता श्री जगदंबे मातेची मंगळवेढा शहरात २२ तर ग्रामीण भागात ६० अशा एकूण ८२ विविध मंडळांनी आई राजा.. उद उद… च्या जयघोषात श्री जगदंबा मातेची प्रतिष्ठापना केली.
दरम्यान आज घटस्थापना असल्याने घरोघरी प्रत्येक कुटुंबियानी घरातील देव्हार्यासमोर पुजा आर्चा करून घटस्थापना केली. नवरात्र महोत्सव हा पारंपारिक सण असून जवळपास ९ दिवस नवरात्र उत्सव मोठया उत्साही वातावरणात चालतो. नवरात्र महोत्सव हा सण पावित्र्यमय समजला जात असल्याने तत्पूर्वी घरोघरी स्वच्छता मोहिम हाती घेवून सर्वत्र स्वच्छता करण्याची पद्धत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाचे आस्मानी संकट जगावर कोसळल्याने सण उत्सव साजरे करण्यावर बंदी घातल्यामुळे ते साजरे करता आले नाहीत.
यंदा मात्र शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. विविध नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते तुळजापूरहून ज्योत आणण्यासाठी रविवारी सायंकाळीच तुळजापूरकडे रवाना झाले होते. ज्योत घेवून रात्रभर पायी पळत सकाळी १० नंतर टप्या टप्याने मंगळवेढयात त्या ज्योत घेवून दाखल झाल्या आहेत. मंगळवेढा शहरातून पारंपारिक वाजंत्री, ढोल, संबळ आदीच्या निनादात ज्योतची मिरवणुक काढल्याने मंगळवेढा शहर भक्तीमय बनले होते.
[read_also content=”कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीला काटामारीचे ग्रहण : राजू शेट्टी https://www.navarashtra.com/maharashtra/sugar-factory-in-kolhapur-district-are-with-fraud-scale-weighing-machines-raju-shetty-nrdm-330050.html”]
दरम्यान या मिरवणुकीनंतर विविध मंडळानी श्री देवीची प्रतिष्ठापना केली. माहुरगड, कोल्हापूर, वणी, तुळजापूर, मांढरादेवी या ठिकाणाहून या ज्योत आणण्यात आल्या होत्या. नवरात्र उत्सव शांततेत पार पडावा याकामी डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी ७ पोलिस अधिकारी, २६ पोलीस कर्मचारी, ४१ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.