सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंगळवेढा : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अपघात रोखण्यासाठी पोलिस अन् प्रशासनांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही अपघाताच्या घटना थांबताना दिसत नाहीत. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. इथाईल ऍसिटेट या रसायनाची वाहतूक केली जात होती. अपघातानंतर महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांनी सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.
अपघातस्थळी मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केली. सकाळी ७.३० वा दरम्यान टँकर (एपी ३१ व्हीसी ८२२७) इथाईल ऍसिटेट रसायन आंध्र प्रदेशात घेऊन निघाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे टँकर डिव्हायडरला धडकला. टँकरमधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक तत्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पोलिसांनी थोड्या प्रमाणात वाहने सोडण्यास सुरुवात केली.
गर्दी लक्षात घेत सध्या वाहतूक एकेरी सुरू केली आहे. टँकर उचलण्याच्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, या महामार्गावर ठाण मांडून आहे. राष्ट्रीय महामार्गावर टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. रसायन ज्वलनशील आहे, यापासून दूर व्हावे व पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग, पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्फोटक रसायनाचा टँकर पलटी झाल्यामुळे वाहने पर्यायी मार्गाने वळविली. रसायन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असून, टँकर उचलण्याच्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, वाहनधारकाने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या पाहणीनंतर रस्ता खुला करण्यात येणार आहे.
– दत्तात्रय बोरीगीड्डे, पोलिस निरीक्षक.
खड्ड्याने घेतला जेष्ठ नागरिकाचा जीव
बेशिस्त वाहन अन् अतिवेगात पुण्यात अपघाती मृत्यू वाढलेले असतानाच रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ७३, रा.औंध) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना नागरस रोड हॉटेल राहुल समोर भाले चौकाकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.