
नागपुरात 'दंत'चे निवासी डॉक्टर तीन महिन्यांपासून बिनपगारी; रुग्णांना बसतोय फटका
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संयम अखेर सोमवारी तुटला. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने नाराज झालेल्या ७२ पदव्युत्तर निवासी डॉक्टरांनी सोमवारी (दि.१२) कामबंद आंदोलन पुकारले. या संपाचा थेट परिणाम ओपीडी आणि आयपीडी सेवांवर झाला.
दंत महाविद्यालयात सध्या ७२ पदव्युत्तर दरमहा ७० हजार इतके विद्यार्थी वेतन मिळते. या रकमेतून मेस शुल्क, पुस्तके, स्टेशनरी यांसह दैनंदिन खर्च भागवावा लागतो. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून वेतन न मिळाल्याने डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. डॉक्टरांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही.
हेदेखील वाचा : Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
दरम्यान, सोमवार असल्याने रुग्णालयात मोठी गर्दी होती. दंत रुग्णालयाची बहुतांश कामे निवासी डॉक्टरांवर अवलंबून असल्याने संपामुळे उपचार सेवा ठप्प झाल्या. अनेक रुग्णांना ‘उद्या या’ असे सांगून परत पाठवले, तर काही रुग्ण दुपारपर्यंत आपल्या नंबरची वाट पाहात बसून राहिले. दंत उपचार ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने एकदा येणाऱ्या रुग्णांना अनेक दिवस पाठपुरावा करावा लागतो. मात्र, अचानक झालेल्या कामबंद आंदोलनामुळे दूरवरून आलेले रुग्ण निराश झाले.
काही डॉक्टर झालेत कर्जबाजारी
काही निवासी डॉक्टर कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असून, काहींना कर्ज काढावे लागले. सोमवारी सकाळी ५० हून अधिक निवासी डॉक्टरांनी डीन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले. या विद्यार्थ्यांच्या वेतनाबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे नियमित पाठपुरावा सुरू असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेतन वितरणास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
हेदेखील वाचा : Nashik Traffic Management : त्र्यंबकरोडवर वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; पोलीस प्रशासनाचा निर्णय