त्र्यंबकरोडवर वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; पोलीस प्रशासनाचा निर्णय
१३ ते १६ जानेवारी रोजी यात्रोत्सव असून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यासह राज्यातून वारकरी, भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघे एक ते दीड वर्ष बाकी असून, या वेळेपूर्वीच रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवरगाव-वाघेरे फाटा-अंबोली फाटा-सापगाववरुन त्र्यंबकेश्वर अशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे सातपूर-त्र्यंबकेश्वर या सध्या काम सुरू असलेल्या रस्त्यावरचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. तर त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणारी वाहतूक पूर्वीच्याच एकेरी मार्गाने ठेवण्यात आली आहे.
सातपूर ते त्र्यंबकेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्ता व इतर बांधकामांमुळे काही ठिकाणी केवळ एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे छोट्या अपघातामुळेही मोठ्या कोंडीची परिस्थिती निर्माण होते. यात्राकाळात ही समस्या अधिक तीव्र होऊ नये, यासाठीच हे तात्पुरते पर्यायी मार्ग लागू करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने वाहनचालक व भाविकांना जाहीर केलेल्या मार्गाचे पालन करण्याचे आवाहन केले असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, आगामी काळात सलग सुट्टांचा मोसम असून, या काळात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यावेळी सुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता एकेरी वाहतुकीबरोबरच पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी होत आहे.






