इंदापुरातील तरंगवाडीत चक्क ईव्हीएमची घोड्यावरुन मिरवणूक; मशीनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी (जि. पुणे )येथे रविवारी (दि. ८) राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची घोड्यावरून मिरवणूक काढत ईव्हीएम समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. तरंगे म्हणाले की, सन २००४ पासून ईव्हीएम अस्तित्वात आले आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत अत्यंत पारदर्शकपणे निकाल देशासह महाराष्ट्रात आले आहेत. लोकसभेला आलेला निकाल विरोधकांना मान्य आहे. कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश मध्ये निकाल आले तेव्हा मशीन चांगली होती परंतू महाराष्ट्रात विरोधकांचा पराभव झाला तेव्हा मशीन खराब झाली. असे राजकारण चुकीचे आहे.
अंतरवाली सराटी मध्ये जो प्रसंग घडवला त्याच पद्धतीने प्रसंग घडवून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. विरोधकांनी नेहमीच महाराष्ट्रातील जनतेमध्ये गैरसमज पसरवून निवडणुका जिंकल्या. महायुतीने लाडक्या बहिणी योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माध्यमातून काम केले. मात्र महाविकास आघाडीने संविधानासंदर्भात फेक नरेटिव्ह केला होता तो पुर्णपणे हाणून पाडण्याचे काम महायुतीने आणि मतदारांनी केले. त्यामुळे महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान झाले आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली.
विरोधकांनी जो मारकडवाडी पॅटर्न देशात सुरु केला आहे त्याचा निषेध करतो. त्या पॅटर्नला देशाची ज्येष्ठ नेते पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांनी ती चूक केली. ते विकासासाठी कधीही मारकडवाडीत गेले नाहीत. राहुल गांधीही त्या ठिकाणी येत आहेत पण ते देखील कधी विकासासाठी त्या ठिकाणी गेले नाहीत. कधी माळशिरस तालुक्यामध्ये आले नाहीत. परंतु मताचे राजकारण करण्यासाठी देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला गैरसमज पासून भयभीत करण्याचे षडयंत्र आम्ही सर्वजण हाणून पाडू, असे डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले.
हे सुद्धा वाचा : 11 तारखेला पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद; ‘या’ पर्यायी मर्गाचा करा वापर
२०२४ पंचवार्षिक विधानसभा निवडणूकीचा निकाल लागताच मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थांनी लागलेला निकाल मान्य नसून निवडणुका ईव्हीएमवर नको तर बॅलेट पेपरवर हव्यात अशी भूमिका घेत गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेस प्रशासनाने मज्जाव करत त्या ठिकाणी कलम १४४ लागू केले आणि जवळपास ८० जणांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे देशासह राज्यात हा विषय चर्चेचा ठरला होता मात्र आत्ता इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील काही ग्रामस्थांनी ईव्हीएम च्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची डीजे लावून घोड्यावरून मिरवणूक काढली. त्यामुळे राज्यात ईव्हीएम मशीनवरून वातावरण तापणार अशी एकंदरीत चित्र आहे.