सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पादचारी दिनानिमित्त बुधवारी (११ डिसेंबर) लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
पुणे महापालिकेकडून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चैाक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : तरुणीला VIDEO व्हायरल करण्याची भिती दाखवली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे –
लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नगरकर तालीम चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शनिपार चौक (चितळे काॅर्नर) येथून वळून बाजीराव रस्तामार्गे अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. नारायण पेठेतील लोखंडे तालीम चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
11 डिसेंबर पादचारी दिन
देशात अनेक ‘दिन’ साजरे केले जातात. त्यात आता अजून एका दिनाची भर पडणार आहे. पादचारी दिन साजरा करणारं पुणे हे देशातील पहिलं शहर ठरणार आहे. सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हा देखील एक महत्वाचा घटक असतो. मोठ्या शहरांमध्ये रस्त्यालगत पादचारी मार्ग बनवलेले असतात. त्या पार्श्वभूमीवर पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, त्याचं महत्व समजावं, या उद्देशानं पुणे महापालिका 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करत असते.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.