indapur sant tukaram maharaj palkhi ringan sohala 2025
इंदापूर/सिद्धार्थ मखरे : सध्या आषाढी वारीचा सध्या सोहळा सुरु आहे. राज्यभरातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या पालख्या देखील मार्गस्थ झाल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा देखील पार पडला आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा अवस्मरणीय रिंगण सोहळा रविवारी (दि.२९) इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तांनी अनुभवला. दरम्यान मालोजीराजेंची भूमी असलेल्या इंदापुरात पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विलास लांडे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, कैलास कदम, पोपट शिंदे, धनंजय बाब्रस यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, नागरिक विविध खात्याचे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, निमगाव केतकी येथील शनिवारचा मुक्काम उरकून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पहाटेच मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे मार्गस्थ झाला. दुपारी बारा वाजता पालखी कदम विद्यालयाच्या रिंगणी पोहचली. सुरुवातीला नगारखाना, मानाच्या आश्वांनी प्रदक्षिणा केली. तदनंतर टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने, अनोख्या चैतन्य व भक्तिरसाने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात झेंडेकरी,तुळशी- वृंदावन धारक महिला, टाळकरी, विणेकरी, पोलीस धावले. विश्वस्त आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात आली. यानंतर दोन्ही मानाच्या अश्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा
लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रसंगी उपस्थितांनी घोड्याच्या टापाखालील माती हाती घेत ती कपाळी लावली.रिंगण सोहळा संपन्न होताच अतिशय भक्तीमय वातावरणात आरती घेण्यात आली. त्यानंतर पालखी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी विसावली.
विविध विभागांकडून चोख नियोजन
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. नागरिकांसह पोलीस आण प्रशासन अधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. नगरपरिषद, पोलीस प्रशासन,महसूल, आरोग्य अशा विविध विभागांकडून चोख नियोजन करण्यात आले होते. रविवारच्या इंदापूर मुक्कामानंतर सोमवारी तुकोबारायांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील सीमेवर नीरा नदीच्या काठी सराटी मुक्कामी असणार आहे.