उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी सेनेच्या आमदारांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
Eknath shinde marathi news : मुंबई : हिंदी भाषा सक्तीवरुन राज्यामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आता एकनाथ शिंदेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता ते सत्तेबाहेर असल्याने अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “जेव्हा ते सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी ही त्रिसूत्री व्यवस्था स्वीकारली होती आणि लागू केली होती. आता ते सरकारमध्ये नसल्याने त्यांची भूमिका बदलली आहे. अशा दुटप्पी राजकारण करणाऱ्यांना मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही.” ते पुढे म्हणाले की, “विरोधी पक्षाच्या नेत्यांची स्वतःची विधाने आहेत ज्यात ते म्हणतात की मुलांनी अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. असे असूनही, सध्याच्या सरकारने मराठी भाषा सक्तीची केली आहे आणि तिला प्राधान्य दिले आहे,” असे म्हणत शिंदे यांनी स्पष्ट केले की हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकारला मराठी भाषेचा आदर
राज्यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याबाबत राजकारण तापले आहे. या विषयावर राज्य सरकार विविध विद्वान आणि भाषेशी संबंधित तज्ज्ञांसोबत संवाद साधत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. या बाबतीत कोणताही अहंकार नाही. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसह आपण सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ. आम्ही मराठीला प्राधान्य दिले आहे आणि तिचा पूर्ण आदर करतो. सरकारने अनेक वेळा जागतिक मराठी परिषद आयोजित केली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मराठी भाषा भवन’ही बांधण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारले, “की जेव्हा हे नेते सरकारमध्ये असतात तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असते आणि जेव्हा ते सत्तेबाहेर असतात तेव्हा त्यांचे वक्तव्य बदलते. जनतेला सर्व काही माहित आहे आणि ही राजकीय युक्ती आता चालणार नाही जनतेला सगळं समजतं,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी महायुतीला फटकारले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, “दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना झाला, पण अकरावीची पहिली गुणवत्ता यादी अद्याप जाहीर झालेली नाही. १३ मे रोजी निकाल लागला, पण ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. ही प्रणाली आधी काही निवडक शहरांमध्ये होती, परंतु ती अचानक राज्यभर लागू करण्यात आली, ज्यामुळे वेबसाइट पहिल्याच दिवशी क्रॅश झाली. आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर यादी जाहीर करण्यात आली. दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.