पोलीस आयुक्तालयाचे कामकाज पेपरलेस; 'या' तारखेपर्यंत होणार ई ऑफिस
पुणे : पुणे पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत कामकाज सुरू केले असून, पोलीस आयुक्तालयातील कामकाज आता पेपरलेस होणार आहे. १५ एप्रिलपर्यंत ‘ई ऑफिस’ प्रणालीची अंमबजावणी करण्याचे काम सुरू केले आहे. ई प्रणाली कार्यान्वित झाल्यास पारंपारिक कागदपत्रांची पद्धत सोडून आयुक्तालयात डिजीटली कामकाज होणार आहे.
सरकारी कामकाजाच्या प्रक्रियेत सुधारणा आणणे, पारदर्शकता वाढवणे आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारी कार्यालयात ‘ई ऑफिस’ प्रणाली राबविण्यात येत आहे. सरकारी कार्यालयांत कागदी कामकाज कमी करणे, डिजिटल दस्तावेजांचा वापर वाढवणे आणि ई-गव्हर्नन्स प्रणालीला अधिक सुलभ व प्रभावी बनवणे, यासाठी ई ऑफिस प्रणाली महत्त्वपूर्ण समजली जात आहे. या पार्श्वभमीवर आता पुणे पोलीस आयुक्तालयात देखील ई ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. सध्या आयुक्तालयातील अनेक विभागात पेपरच्या माध्यमांतून पारंपरिक पद्धतीने कामकाज केले जाते. लवकरच ही कामे डिजिटल स्वरूपात सुरू होतील. त्यामुळे नागरिकांनाही जलद सेवा मिळू शकेल. डिजीटल प्रणालीमुळे कामांचे ट्रॅकींग करण्यासह त्यांची सद्यस्थिती तपासण्यात सुलभता येते. येत्या १५ एप्रिलपर्यंत आयुक्तायात ही प्रणाली राबविण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली.
मल्टिमीडीया सेल
पोलीस आयुक्तलयातील कॉम्प्यूटर सेल आता मल्टिमीडीया सेलमध्ये कन्व्हर्ट केला जाणार आहे. सेलच्या माध्यमातून आयुक्तालयातील ऑनलाईन कामकाजावर लक्ष ठेवले जाईल. पोलीस ठाणे पातळीवर काही ऑनलाईन कामे केली जातात. त्यामध्ये मल्टिमीडीया सेलच्या माध्यमातून समन्वय साधला जाणार आहे.