आगामी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election २०२४) तिसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी काही दिवसांआधी गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन केले होते. यात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते , आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांची पहिली सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये राज ठाकरे यांची ४ मे ला सभा होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे कार्यकर्त्ते आधीपासूनच तयारीला लागले आहेत. रत्नागिरीमध्ये नुकतीच मनसेच्या नेत्यांनी पहिली सभा घेतली. तसेच त्यानंतर येणाऱ्या एक दोन दिवसांत राज ठाकरे सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या प्रचारानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत आणखीन नवे रंग येणार आहेत. या सभेत राज ठाकरे नेमकं कोणावर निशाणा साधणार, नेमकी कोणावर टीका करणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या प्रचारासाठी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची अनुपस्थिती असल्याची खंत व्यक्त केली. मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरे नाहीत, त्यामुळे त्यांची आठवण येते. राज ठाकरे यांचे आभार, मनसेने माझ्यासाठी भव्य सभेचे आयोजन केले, असे म्हणत नारायण राणे यांनी मनसेचे आभार मानले. तर उदय सामंत म्हणाले, राज ठाकरे यांचे भाषण व्यासपीठावरुन ऐकण्याचा योग यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.