Photo Credit : Team Navrashtra
मुंबई : पुण्यातील पोर्शेकार अपघात आणि मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. विधीमडंळाच्या पावसाळी अधिवेशात हा मुद्दा उपस्थित करत वरळीत झालेला प्रकार हा अपघात नसून खून असल्याचा आरोप करत त्यांनी मिहीर शाहावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही केली. इतकेच नव्हेतर आता मिहीर शाहाच्या घरावर बुलडोजर चालवणार का असा खडा सवालही मुख्यमंत्र्यांना केला आहे.
वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पसार झाला. दोन दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचबरोबर मिहीरला मदत करणाऱ्या 12 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व घटनाप्रकारावर प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पोलिसांनी मिहीरला अटक केली असली तरी त्याच्यावर मर्डरची केस म्हणूनच गुन्हा दाखल केला पाहिजे, न्यायालयात ती केस लढवली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
दरम्यान, आज (10 जुलै) आदित्य ठाकरे यांनी वरळीतील अपघात प्रकरणातील पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. यावरही त्यांनी भाष्य केलं. आदित ठाकरे म्हणाले, मी नाखवा कुटुंबियांची भेट घेतली. ते इतकं भयंकर होते की एखादा राक्षसच असे करू शकतो. 60 तास मिहीरला लपवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाचे उपनेते राजेश यांना फक्त पदावरून हटवले आहे. पक्षातून काढलेले नाही. आता मुख्यमंत्री त्यांच्या घरावर बुलडोजर चालवणार का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
आम्ही पीडित कुटुंबियांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलेली परिस्थिती अतिशय भयानक आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी हे प्रकरण मर्डर म्हणूनच लढवले गेले पाहिजे. नरकातून राक्षसाला आणलं असतं तरी त्यानेही असे कृत्य केले नसते. अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. तसेच, अपघात झाल्यानंतर गाडीवर लावण्यात आलेले पक्षाचे चिन्ह काढण्यात आले, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.