पालघरमधील मोखाडा तालुक्यात जगदंबा उत्सवाची लगबग, बाजार पेठेला आली रौनक
दीपक गायकवाड/मोखाडा: मोखाडा तालुक्याला जगदंबा उत्सवाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. त्या धर्तीवरच खोडाळा येथील जगदंबा ( बोहाडा ) उत्सव तालुक्यात परिचित होता. बरेच वर्ष खंडीत असलेला खोडाळ्याचा जगदंबा उत्सव हा जुन्या जाणत्याच्या नेतृत्वात एक अनोखी झळाली घेऊन नव्याने साजरा होत आहे. त्यामुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले असुन चलन वलन वाढल्याने रौनक आली असुन एकूणच व्यापारी वर्ग सुखावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खोडाळा येथील जगदंबा उत्सवाचे हे तीसरे वर्ष असून यंदा कुस्त्यांचा जंगी फड मात्र पहायला मिळणार नाही.
मोखाडा तालुक्याची शेकडो वर्षांची आदिवासींची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा मातेचा उत्सव अर्थात बोहाडा खोडाळा शहरातही दि. 15,16,17 तारखेला साजरा होत असून दि.18 रोजी जगत जननी आई जगदंबेच्या मिरवणूकी नंतर उत्सवाची सांगता होणार आहे. जगदंबेच्या भव्य मिरवणुकी नंतर कुस्त्यांचा जंगी फड पहायला मिळत असतो कुस्त्यांमध्ये गावोगावचे पहिलवान हजेरी लावतात त्याशिवाय बक्षीसांचे मोठाले आकडे , मानाची गदा अशी विविध आकर्षणं भुरळ घालत असल्याने या कुस्त्या बहारदार होत असतात. मात्र याही वर्षी कुस्त्यांचा फड रद्द करण्यात आल्याने कुस्ती प्रेमींचा हिरमोड होणार आहे.
Pune News: “मागण्या मान्य होईपर्यत…”; भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांचा इशारा
जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा राज्याच्या प्रत्येक आदिवासी बहुल भागात साजरा केला जातो, परंतू पूर्वीचा ठाणे व आताचा पालघर हा आदिवासी जिल्हा असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड या 70 टक्के आदिवासी समाज असलेल्या तालुक्यात विविध गांवपाड्यात सुध्दा जगदंबेचा उत्सव असलेला बोहाडा आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊन आदिवासी कला व संस्कृतीची शेकडो वर्षाची परंपरा ही सर्व धार्मियाकडून बंधू भावाने जपली जाते. हेच या उत्सवाचे फलित आहे.
उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश येलमामे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळे, दिनकर पाटील,यांचेसह उत्सव समिती आणि ग्रामस्थ मंडळींनी उत्सवाचे नियोजन उत्तम केले असुन जगदंबा उत्सव शांततेच्या वातावरणात संपन्न करण्यावर भर दिलेला आहे.
रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो, विविध देवदेवतांचे मुखवटे व वेष परीधान करून आदिवासींच्या पारंपारीक संबळ वाद्याच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीनेच ही सोंगे नाचविली जातात. भक्तांच्या हातातील टेंभ्याच्या उजेडात ही विविध सोंगे पहाटेपर्यत नाचविली जातात, देव-दानवांचे युध्द व हनुमानाच्या शेपटीला अग्नी लावून नाचविलेले सोंग हे बोहाड्याची रंगत असते.तर दशानन रावण हे जगदंबा उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.
वशी श्री गजाननाचे विधिवत पूजन व मिरवणूक अर्थात थाप रात्री 9 ते 12 वाजेपर्यत, दुसऱ्या दिवशी लहान बोहाडा, तिसऱ्या दिवशी 17 मे ला मोठा बोहाडा रात्रभर तर दि. 18 मे रोजी देवीची महापूजा सकाळी 9 वा. होऊन त्यानंतर शहरातून महिषासुर व देवीचे युध्द आणि मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता होते.अशी परंपरा आहे.
दरम्यान गेल्या मंगळवार पासून मोखाडा तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने तुंबळ हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे.दिवसभरात किंवा रात्री अपरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने एकूणच जगदंबा उत्सवावर पावसाचे ढग कायम आहेत.त्यामूळे खाऊंचे, खेळण्याची दुकाने,रहाट पाळणे,शोभेच्या वस्तू सजवून दुकान मांडणाऱ्या व्यापारी बांधवांना आगंतुक पावसाचा अदमास घेऊनच दुकानदारी करावी लागणार आहे.