मंदिरावरील कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पुणे : मुंबईतील जैन मंदिराबाबत राज्य सरकारने आश्वासन दिले असले तरी, पुण्यात मंगळवारी होणारे धरणे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही, अशी भुमिका सकल जैन संघाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. प्रस्तावित आंदोलनाला तब्बल १२५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
विले पार्ले येथील जैन मंदिवरील कारवाईचा निषेध करण्यासाठी, मंगळवारी (ता.२२) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत रूपरेषा ठरवण्यासाठी रविवारी रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपापली भुमिका मांडत अचल जैन आणि मिलींद फडे आदींनी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे जाहीर केले.
विले पार्ले मंदिर पुनर्बांधणीबाबत, कार्यकर्त्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी, अनुचित दावा केला जात आहे. आपली कोणतीही प्रमुख मागणी मान्य झालेली नाही, मंदीर उभारण्याबाबतही ठोस आश्वासन मिळालेले नाही. राज्य सरकारने सकारात्मक असे कोणतेही आश्वासन लेखी स्वरूपात दिलेले नाही. उलट अधिकाऱ्यांनी पवित्र प्रतिमेची विटंबना करून गंभीर गुन्हा केलेला आहे, असेही बैठकीत संयोजकांनी स्पष्ट केले.
इतकेच नव्हे तर, या प्रकाराबाबत राजकारण्यांनी आपली भुमिका जाहीरपणे स्पष्ट करावी तसेच आंदोलन मागे घेतले तर ती गंभीर चूक होईल, आज आपण गप्प बसलो तर भविष्यात देशभरातील जैन मंदिरे नष्ट करण्यात येतील. विलेपार्ले येथील या मंदिराचे दगडी जिनालय होणे आपली प्राथमिकता असली पाहिजे, तसे न झाल्यास हे मंदिर सरकारी अपकृत्यामुळे लूप्त झाले असे समजण्यात येईल. याचे तीव्र परिणाम सरकारला भोगावे लागतील,असेही स्पष्ट करण्यात आले.
आजचे आंदोलन हे केवळ एका मंदिराचे नव्हे तर संपुर्ण जैन समाजाच्या अस्मिता आणि अस्तित्वाचे युध्द आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता आंदोलन ठामपणे परंतु अहिंसक मार्गाने सुरू ठेऊ. तसे झाले तरच आपल्या धर्माचे रक्षण होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला, अचल जैन, मिलींद फडे, विजयकांत कोठारी, महावीर कटारीया, ॲड. योगेश पांडे, इंदर छाजेड, विरेंद्र शहा, सतीश शहा, संजय ओसवाल,विठ्ठल साठे, प्रवीण चोरबेले, संजय नाईक, भरत सुराणा, दिलीप कांकरीया, अण्णा पाटील, नितीन जैन, वीरकुमार शहा, मनीष जैन, सुनेयजी शहा, समीर शहा, राजेंद्र शहा, सुनिल कटारीया, विनय चुडीवाल, जवाहर गुमते, समीर जैन, सत्यजीत शहा, शीतल लोहाडे आदी मान्यवरांसह विविध जैन मंदिर, स्थानकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.