
जत नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन, परिवहन कार्यालय, स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, नमो गार्डन, उपजिल्हा रुग्णालय तसेच अभ्यासिका आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना राजकारणासोबत समाजकारणाची जोड देण्याचा सल्ला दिला. ज्या गावात तुम्ही राहता, त्या गावातील समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा आराखडा तयार करा. शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले.
जत तालुक्याचा विकास झपाट्याने होत असून भविष्यात या विकास प्रक्रियेला आणखी गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन काम सुरू असून जतच्या विकासातही शासन कोणतीही कमतरता ठेवणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कामाचे कौतुक करत गेल्या दोन वर्षांत महायुतीच्या माध्यमातून जत तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे दुष्काळाचा कलंक घेऊन जगणाऱ्या जत तालुक्याचा हा कलंक पुसण्याचा ध्यास आमदार पडळकर यांनी घेतला आहे. जत ही दुष्काळी भूमी नसून देवभूमी आहे. अनेक देवदेवतांची भूमी असलेल्या या तालुक्याचे महत्त्व विरोधकांना काय कळणार? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आमदार गोपीचंद पडळकर हे जतला मिळालेले ‘कोहिनूर हिरा’ असल्याचे सांगत खोत यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याचे नमूद केले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जत तालुक्यावर विशेष लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.तुमच्या जन्मात जेवढा विकास झाला नसेल, तेवढा विकास मी करून दाखवणार, असा विश्वास व्यक्त करत पडळकर यांनी आगामी काळात रस्ते विकासासाठी आणखी निधी मंजूर करून घेणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात सध्या पाण्यासाठी दहा टँकर सुरू असून भविष्यात जत तालुक्यावर अशी परिस्थिती राहणार नाही, यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जतच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असून लोडशेडिंग कमी करण्यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे पडळकर म्हणाले.
जतच्या भविष्यातील विकासाचे व्यापक चित्र मांडताना आमदार पडळकर यांनी सांगलीला विमानतळ होत नसेल तर जतला विमानतळ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे असून संपूर्ण भारतात जत तालुक्यात सर्वाधिक मंदिरांची संख्या असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक मंदिरांच्या विकासाचे आराखडे तयार असून लवकरच त्यांची कामे सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची एक वर्षाच्या आत पूर्तता करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा विकास करण्याबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. जत शहरासाठी सुसज्ज बसस्थानक आणि नाट्यगृह उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
राजकारणात येणाऱ्या व्यक्तींना समाजकारणाची आवड असणे आवश्यक आहे, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातील मूलभूत समस्या समजून घेऊन त्यावर ठोस आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, सभापती अर्चना पाटील, उपसभापती रावीकुमार बगली, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपरिषदेची नूतन इमारत, परिवहन कार्यालय, स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, नमो गार्डन, उपजिल्हा रुग्णालय आणि अभ्यासिका यांसारख्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण झाल्याने जत शहरासह तालुक्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासावर भर देण्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले.