क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्यात आता ‘नाना-नानी पार्क’ या उपक्रमाची भर पडली आहे. या पार्कमध्ये सर्व बावधनकरांना विरंगुळ्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना निवांत वेळ घालवण्यासाठी उपयुक्त अशी बैठक व्यवस्था, शोभिवंत झाडे आणि विद्युत प्रकाश व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यातील प्रारंभिक टप्पा म्हणून परिसरात विविध सुशोभित झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
आपण ज्या मातीत जन्मलो, वाढलो त्या मातीचे ऋण फेडण्याच्या उदात्त भावनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच बावधनच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांतपणे बसता येईल, संवाद साधता येईल आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल, अशी जागा या पार्कच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, बावधनच्या सरपंच सौ. वंदना कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुणादेवी पिसाळ यांनी मंगलमूर्ती सोशल क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. तसेच क्लबने अंत्ययात्रेसाठी तयार केलेल्या रथाचे कार्यही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरपंच सौ. वंदना कांबळे यांनीही क्लबच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगलमूर्ती सोशल क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीची ही वाटचाल अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

