Satara Water Crisis: विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न
करंदोशी व नेवेकरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून त्यापैकी नेवेकरवाडी साठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. ही विहीर ज्या ओढ्यालगत आहे. या विहिरीला पाणी वाढण्यासाठी आडवे बोअर मारले आहेत हे बोअर ओढ्याच्या दिशेने आहेत व याच पाईपमधून ओढ्यातील दूषित पाणी विहिरीत येते. त्यामुळे विहिरीतील पाणी पूर्णपणे काळे पडले असून त्याला मळीचा वास देखील येत आहे.
विशेषत पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचा प्रकार जास्त असून हे पाणी गुरेढोरे सुद्धा पित नाहीत असा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळे ग्रामस्थ व महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापासून हा प्रकार असून देखील प्रशासन मात्र त्याबाबत अनभिज्ञ आहे.
नेवेकरवाडी साठी दोन वर्षापूर्वीच जलजीवन मिशन मधून नवीन विहिर बांधून पूर्ण आहे मात्र त्यासाठी ट्रान्सफार्मर अजून उपलब्ध न झाल्याने ती कार्यान्वित नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गावाला भेडसावत असून त्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकार्यांना याची कल्पना देऊनही संबंधितांनी आजपर्यंत त्यावर कोणतीच हालचाल केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गावात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तसेच संबंधित विहिरीचे पाणी आरोग्यास धोकादायक असल्याने पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत.





