कल्याण : कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हाझला खान आणि अनस शेख यांना वांद्रे येथून अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर दोघेही फरार झाले हेाते. मात्र सीसीटीव्हीच्या साहाय्याने खडकपाडा पोलिसांनी या दोघांना अठरा तासांच्या आत शोधून काढले आहे. धक्कादायक म्हणजे तुझ्या ट्रकमुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे म्हणून आम्हाला पैसे दे असा बहाणा करुन दोघे ट्रक चालकाकडून जबरदस्तीने पैसे मागत हेाते. ट्रक चालक भोला याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांची हत्या केली.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात एक ट्रक चालक भोला कुमार महंतो याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. गाडीच्या एका चालकाचा बोल्ट खाली पडल्याने त्याने कोन गाव ब्रीजवर गाडी उभी केली. गाडी चेक करीत असताना दोन तरुण एका दुचाकीवरुन त्याच्याकडे आले. दोघांनी सांगितले की, तू ट्रक थांबविल्याने आमच्या गाडीचे नुकसान झाले. आमच्या गाडीची नुकसान भरपाई दे. परंतू भोला याने त्याच्या गाडीमुळे नुकसान झालेले नाही. त्यामुळे मी काही पैसे देणार नाही. यावरुन दोघांनी भोला याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादादरम्यान दोघांपैकी एकाने धारदार शस्त्राने भोलावर वार केले. भोला याचा जागेवर मृत्यू झाला. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपीना शोधण्यासाठी काही तपास पथके नेमली गेली. अखेर १८ तासांच्या आत दोन्ही आरोपींना वांद्रे येथून अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकाची हत्या करुन दोघेही अजमेर जाण्याच्या तयारीत होते. त्याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.