कल्याण : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच झोपेत असलेल्या मित्राची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरामध्ये उघडकीस आली. अनिल यादव असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी हिरालाल निषाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण पूर्वेकडील खडे गोळवली परिसरामध्ये अनिल यादव त्याचा मित्र हिरालाल निषाद एका चप्पलच्या कारखान्यात काम करतात. याच कारखान्याच्या गोडाऊन मध्ये हे दोघे आपल्या सहकार्यासोबत राहतात. काल रात्रीच्या सुमारास अनिल यादव आणि हिरालाल निषाद हे दोघे दारू प्यायले होते. किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून अनिलने हिरालालच्या तोंडावर पाणी फेकले. त्यामुळे संतापलेल्या हिरालाल याने अनिलला धमकी दिली.
रात्रीच्या सुमारास अनिल गोडाऊन मध्ये झोपलेला असताना हिरालाल याने मोबाईल चार्जरच्या वायरने अनिलचा गळा आवळून त्याची हत्या केली. सकाळी कामगारांनी अनिलचा मृतदेह पाहून याबाबत पोलिसांना कळवले. कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. या हत्येप्रकरणी हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.